अलिबाग | पेझारीच्या नाक्यावरुन लाल बावटा खाली उतरेल, अशी कल्पना कोणीही केली नव्हती. मात्र शेकाप नेते जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील व भाचे अॅड. आस्वाद पाटील यांच्या कुटुंबानेच बुधवारी (१६ एप्रिल) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शेकापच्या या बालेकिल्ल्यात पक्षालाच नाही तर पाटील कुटुंबातच उभी फूट पडली आहे.
पक्षनेत्यांकडून अन्याय होत असल्याचे सांगत पंडित पाटील यांनी पक्षाला अखेरचा ‘लाल सलाम’ केला आहे. पंढरपूरच्या अधिवेशनात पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पंडित पाटील यांनी व्यासपीठावरुनच सुनावले होते. पक्षात पर्यायाने दोन भावांमध्ये तेव्हाच वादाची ठिणगी पडली होती. विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांनी पंडित पाटील, आस्वाद पाटील यांना डावलून सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली आणि पेझारीकर प्रचंड नाराज झाले.
जयंत पाटील यांनीदेखील त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला नाही. काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. विधानसभा निवडणुकीत पंडित पाटील, आस्वाद पाटील यांचे कुटुंब अलिप्त राहिले. या निवडणुकीत शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील पराभूत झाल्या. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आस्वाद पाटील, सवाई पाटील हे अन्य पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी या पक्षाकडून त्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा होती.
अंतिमतः पेझारीकरांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. बुधवारी, १६ एप्रिल रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पंडित पाटील, आस्वाद पाटील, चित्रलेखा पाटील यांच्यासह, माजी जिल्हा परिषद सदस्य, काही पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच अनेक शेकाप कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रायगडचे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी भाजपचे नेते सतिश धारप, आ.प्रशांत ठाकूर, आ.महेश बालदी, युवा अध्यक्ष आ. विक्रांत पाटील, अॅड. महेश मोहिते उपस्थित होते. यावेळी खासदार धैर्यशील पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना, पंडित पाटील व त्यांच्या सहकार्यांच्या भाजप प्रवेशाने पक्षसंघटनेला मोठी बळकटी मिळणार असल्याचे म्हटले. यावेळी वैकुंठ पाटील, अॅड.निलिमा पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिंदे आदींसह भाजप नेते, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शेकापच्या या नेत्यांचा प्रवेश
पंडित पाटील यांचे भाचे, माजी मंत्री स्व. मीनाक्षीताई पाटील यांचे पूत्र अॅड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती चित्रा पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रियदर्शिनी पाटील, संजय पाटील, सवाई पाटील, सुमन पाटील, प्रिती पाटील, यतिन घरत, वैभव चांदे, वसंत यादव, राजेश सानप तसेच शेकापचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला.