कर्जत | मध्य रेल्वेच्या मुंबई पुणे मार्गावरील कर्जतपासून खंडाळा भागातील स्टेशन ठाकूर वाडी येथे रेल्वे मार्गाच्या बाजूला बॅगमध्ये मृतदेह आढळून आला होता. महिलेची हत्या करुन मृतदेह बॅगमध्ये भरुन याठिकाणी फेकण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. याप्रकरणी खुनीचा शोध घेण्यासाठी रायगड पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.
हा मृतदेह रेल्वे मार्गाच्या कडेला कोणी आणून टाकला की धावत्या रेल्वे गाडीमधून फेकून दिला? याचा तपास गुन्हे प्रकटीकरण टीमकडून सुरु आहे. कर्जत तालुक्यातील बीड ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणार्या ठाकूरवाडी रेल्वे स्टेशनजवळ ही घटना समोर आली आहे.
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील किलोमीटर क्रमांक ११२ च्या आसपासच्या पटरीलगत एका गुलाबी रंगाच्या ट्रॉली बॅगेमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोरीने बांधून बॅगेत भरलेल्या या मृत महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असण्याची शक्यता दर्शवली जात आहे.सदर मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे पथक आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक तपासात महिलेच्या शरीरावर कोणतेही जखमेचे चिन्ह नसल्यामुळे तिचा मृत्यू गळा दाबून घातपाताने झाला असावा, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मृतदेह सापडलेली बॅग रेल्वे पटरीपासून अगदी जवळ होती. त्यामुळे ही बॅग ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आल्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. घटनास्थळाची पाहणी करताना पोलीस व रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी अनेक पुरावे गोळा केले असून, तपास अधिकाधिक खोलात सुरू आहे. या हत्येमागे कोणाचा हात आहे? याचा शोध घेण्यासाठी रायगड जिल्हा पोलिसांची तीन तपास पथके तैनात करण्यात आली आहेत.
पोलिसांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील तपासासाठी रेल्वे सुरक्षा बल, स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखा संयुक्तपणे काम करत आहेत. मृत महिलेची ओळख पटवणे आणि या घटनेमागील कारणे उलगडणे सध्या तपासाचा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची टीम तैनात केली आहे.
त्याचवेळी कर्जत आणि नेरळ पोलीस ठाणे यांचे गुन्हे प्रकटीकरण पथक यांना रवाना करण्यात आले आहे. स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक हे कर्जतमध्ये येत असून शालेय मुलींच्या लैंगिक छेड प्रकरण आणि सुटकेसमधील महिलेचा मृतदेह या दोन घटनांचा आढावा जिल्हा पोलीस प्रमुख घेणार असून कर्जत पोलीस ठाणे आणि पोलीस उपअधीक्षक कार्यालय यांना गुन्ह्याच्या तपास कामी मार्गदर्शन करणार आहेत.