चिमुरडींचा छळ | कर्जत शिक्षण विभागाकडून आज सर्व शाळांच्या समन्वय सभेचे आयोजन

By Raigad Times    21-Apr-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | कर्जतमध्ये उघडकीस आलेल्या लहान मुलींच्या लैंगिक छळवणुकीच्या घटनेनंतर, असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी कर्जत शिक्षण विभागाकडून सर्व शाळांची समन्वय सभा आज, २१ एप्रिल रोजी आयोजित केली आहे. कर्जत शिक्षण विभागाने या सभेसाठी पुढाकार घेतला या सभेत स्कूल बसबद्दल अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.
 
खालापूर तालुक्यातील स्कूलमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर पालक, शिक्षक, संस्था चालकांसोबत बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमावली तयार करण्यासाठी शिक्षण विभागाकडून पावले उचलली जात आहेत. पोलीस प्रशासन सतर्क झाले असून सर्व पातळीवर जागरूकता कायम ठेवण्यासाठी नियमावली बनविण्यावर भर देण्यात आला आहे.
 
त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड यांनी संस्था चालक, पालक यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक कर्जत शहरातील गुंडगे भागात असलेल्या डॉन बॉस्को शाळेत होणार आहे. या बैठकीसाठी सर्व केंद्रप्रमुख तसेच जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक यांच्याशी विनाअनुदानित अनुदानित आणि खासगी शाळा यांचे सर्व व्यवस्थापन यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचवेळी प्रती शाळा एक पालक प्रतिनिधी, एक शिक्षक प्रतिनिधी तसेच स्कूल बस चालक मालक संघटनेचे प्रतिनिधी यांना बोलावण्यात आले आहे.