कर्जत | मुंबई येथून पुण्याकडे निघालेल्या एलटीटी - चेन्नई एक्स्प्रेसमधून लहान बालकांची संशयास्पद वाहतूक उघडकीस आली आहे. बिहार येथून मुलांना कर्नाटकडे घेऊन निघालेल्या मदरसा शिक्षकाच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. त्यामुळे गाडी कर्जत स्थानकात आल्यानंतर, कारवाई करत रेल्वे पोलिसांनी २९ बालकांची सुटका करत, त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.
मध्य रेल्वेवरील कुर्ला स्थानकातून सुटणारी एलटीटी- चेन्नई एक्सप्रेस ही नेहमीप्रमाणे १८ एप्रिल रोजी चेन्नईकडे निघाली होती. या गाडीच्या कर्जत बाजुकडील पहिल्या सर्वसाधारण डब्यातून एक व्यक्ती आपल्यासोबत २९ बालकांना घेऊन चालला असल्याचे आढळून आले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने, याबाबतची माहिती कर्जत येथे रेल्वे पोलिसांना देण्यात आली.
माजी मनसे रायगड जिल्हा सचिव व सध्या शिवसेना नेत्या आकांक्षा रांकीत शर्मा-सावंत व त्यांच्या सहकारी सेजल नागावकर यांनी ही बाब रेल्वे जीआरपीच्या १५१२ या हेल्पलाईन क्रमांकावर कळवली होती. त्यानुसार, रात्री ८:३५ वाजता कर्जत रेल्वे स्टेशनवर चेन्नई एक्सप्रेस आल्यानंतर पोलिसांनी डब्यात तपासणी करून २९ लहान मुले व त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीला खाली उतरवले.
त्या बालकांना कर्नाटक येथे घेवून जाणारी व्यक्ती मोहम्मद जलालउद्दीन मोहम्मद फिदा हुसैन सिद्दीकी (वय २८ वर्षे) हा पेशाने मदरसा शिक्षक असल्याची व तो बिहार राज्यातील अररिया जिल्ह्यातील जोकीहाट ब्लॉकमधील रहिवासी असल्याची माहिती चौकशीत समोर आली. त्याच्यासोबत कर्नाटक येथे निघालेली ती २९ बालके ही बिहार राज्यातील जोकी पोस्ट ब्लॉक येथील असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्या सर्व बालकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला.
रेल्वे प्रवाशांना आवाहन
रेल्वेमध्ये प्रवास करताना आपण फक्त स्वतःच्या सुरक्षेपुरते मर्यादित न राहता, आजूबाजूला घडणार्या घटनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. संशयास्पद हालचाली, विशेषतः लहान मुलांचे मोठ्या संख्येने अनोळखी व्यक्तीसोबत प्रवास करणे, यासारख्या बाबतीत खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ रेल्वे पोलीस हेल्पलाइन १५१२ किंवा १३९ वर संपर्क साधावा.
लहान मुलांची गैरसोयीची अवस्था, भीतीदायक वर्तन किंवा अनोळखी व्यक्तींबरोबर असणं यावर लक्ष ठेवावे. प्रत्येक प्रवाशाने समाजहिताची जबाबदारी या भावनेने प्रवास करावा. फोन, फोटो किंवा व्हिडिओद्वारे शक्य असेल तर घटना टिपून अधिकार्यांना पूरक माहिती द्यावी. तसेच खबरदारी घेताना स्वतःच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी.