अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण , अभय कुरुंदकरला जन्मठेप

इतर दोघांना सात वर्षांची शिक्षा ; पनवेल सत्र न्यायालयाचा निर्णय

By Raigad Times    22-Apr-2025
Total Views |
panvel
 
पनवेल | सहाय्यक पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच २० हजारांचा दंडही सुनावण्यात आला आहे. तर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोघांना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बहुचर्चित पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे अपहरण आणि हत्या प्रकरणात बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी असल्याचेच समोर आले.
 
तर महेश फळणीकर आणि कुंदनलाल भंडारी यांना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी जाहीर करण्यात आले. तसेच याप्रकरणातून ज्ञानदेव उर्फ राजू पाटील याला पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. ९ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिका आणि कार्यपध्दतीवर न्यायालयाने ताशेरे ओढले. अश्विनी बिद्रे यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.
 
त्यांची २०१५ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मात्र त्या कळंबोली पोलीस ठाण्यात रुजू झाल्याच नव्हत्या. दीड वर्षांपासून त्या बेपत्ता होत्या. अश्विनी यांच्या कुटुंबियांनी कळंबोली पोलीस ठाण्यात अभय कुरुंदकर यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी कुरुंदकर यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले होते.
 
उच्च न्यायालयाने अश्विनी बिद्रे यांचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. ११ एप्रिल २०१६ रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याची बाब उघड झाली. अनैतिक प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आली. या प्रकरणात भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याचा तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी होता.
 
अश्विनी बिद्रे यांची हत्या करून आपल्या साथादीरांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या याप्रकरणी अभय कुरुंदकर, ज्ञानदेव पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना अटक करण्यात आली. दरम्यान पनवेल सत्र न्यायालयाने अभय कुरुंदकरला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर इतर दोन कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.