खोपोली | जुना मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात बॅटरी हिल अमृतांजन ब्रीजजवळ भरधाव मालवाहु ट्रकने पाच वाहनांना धडक दिल्याने, झालेल्या भीषण अपघातात इनोव्हामधील पिता-लेकीसह तिघांचा मृत्यू झाला. तर ९ जण जखमी झाले. दरम्यान, या अपघातप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरार आहे. अपघातग्रस्त इनोव्हा कारमधील प्रवासी हे अलिबागवरुन पुण्याच्या दिशेने निघाले असताना ही दुर्घटना घडली.
रविवारी, २० एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा गावच्या हद्दीत लोणावळा येथून खोपोलीकडे निघालेल्या भरधाव मालवाहू ट्रकवरील चालकाने बॅटरी हिलजवळ इनोव्हा कार, अर्टीगा, रिक्षा, टाटा पंच व हायवे पेट्रोलिंगचे वाहन अशा पाच वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात इनोव्हा कार (एमएच१९बीजी८०६७) च्या पाठीमागील बाजूचा चुराडा होऊन निलेश संजय लगड (वय ४२) व त्यांची मुलगी श्राव्या निलेश लगड (वय १२, दोघे राहणारसदाि शवपेठ पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला.

तर गंभीर जखमी झालेल्या प्रिया सागर इंगुळकर (वय ३४, रा. शुक्रवार पेठ, टिळक रोड, पुणे) यांचा अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अश्विनी रमेश जाडकर (वय ४३), ओमकेश रमेश जाडकर (वय २२, सुमित तुकाराम कदम (वय २४), पुष्कार लक्ष्मण शेळकंदे (वय २५, जिगनेश रमेश जाडकर (वय १२), संजय नामदेव वाल्हेकर (वय ४२) आणि विमल नामदेव वाल्हेकर (वय ६९) हे सातजण जखमी झाले आहेत. हे सर्वजण भिवंडी जि.ठाणे येथील राहणारे आहेत. तसेच अन्य वाहनामधील विवेक पाटील (वय ४५) व मिताली केरकर (वय ४५) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, लोणावळा, खंडाळा पोलीस यांच्यासह खोपोली येथील ‘अपघाताग्रस्तांच्या मदतीसाठी’ या संस्थेचे स्वयंसेवक, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महाराष्ट्र सुरक्षा बल, पवना आणि लोकमान्य हॉस्पिटलच्या अॅम्बुलन्स, स्वामिनी अॅम्बुलन्स सर्व्हिसेस या सर्व यंत्रणा अपघातस्थळी दाखल झाले. तातडीने मदतकार्य सुरु करत, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातामध्ये या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. दरम्यान, या अपघातप्रकरणी सागर पांडुरंग इंगुळकर यांनी फिर्याद दाखल केली असून, जीजे०३-बीटी ६७०१ या ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.