जम्मू काश्मीर पहलगाम येथे दहशतवादी हल्ला; २७ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील दोन पर्यटक मृत्यूमुखी, पनवेलमधील एका रहिवाशाचा समावेश

By Raigad Times    23-Apr-2025
Total Views |
mumbai
 
मुंबई | जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या पर्यटकांवरील हल्ल्यामध्ये २७ हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून पनवेल खांदा कॉलनी येथील दिलीप देसले आणि अतुल मोने अशी मृत पर्यटकांची नावे आहेत.
 
तर दोन पर्यटक जखमी असून यातील एकजण पनवेलचे रहिवासी आहेत. मृतांच्या आकड्यामध्ये वाढ होऊ शकते. तसेच अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
 
हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते. पुण्यातील पाच जणांचे कुटुंब पेहेलगामला पर्यटनासाठी गेले होते. ज्यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिला होत्या.अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधे एका व्हॅलीत पर्यटकांसह हे कुटुंब काश्मीरी पोषाख घालून फोटो काढत होते.
 
त्यावेळी त्यांच्यासमोर अचानक दहशतवादी आले. या पर्यटकांना दहशतवाद्यांनी नावे विचारली. नावांवरुन त्यांचा धर्म लक्षात आला. त्यानंतर दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला.जखमींमधील काश्मीर प्रशासनाने कळविलेली नावे ही माणिक पटेल हे पनवेल येथील रहिवासी आहेत, तर एस. भालचंद्रराव असे त्यांचे नाव आहे. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
पनवेलमधून गेले होते ३९ पर्यटक...
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग ट्रॅव्हल्स पनवेल येथून एकूण ३९ पर्यटक जम्मू कश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यातील दिलीप देसले (रा. खांदा कॉलनी पनवेल) यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तसेच सुबोध पाटील (रा.पनवेल) हे जखमी झालेले आहेत. त्यांना श्रीनगर येथे हॉस्पिटलमध्ये एयरलिफ्ट करुन त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.