कर्जत | शहरातील पाच वर्षीय तीन मुलींच्या लैंगिक छळवणूक प्रकरणी जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी खालापूर तालुक्यातील लोधीवली येथील सेंट जोसेफ शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सिसिलिया यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे निर्देश दिले आहेत. लहान मुलींवरील लैंगिक प्रकरणानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती.
सेंट जोसेफ कॉन्व्हेट स्कूल, लोधीवली येथे शिकणार्या तीन चिमुरड्या मुलींवर शाळेच्या बस मध्ये २४ वर्षीय तरुण करण दीपक पाटील (बस कर्मचारी) याने लैंगिक अत्याचार केले होते. गेली वर्षभर अत्याचार होत असताना त्या तीन मुलींनी आपल्या पालकांना ही माहिती दिल्यानंतर १६ एप्रिल २०२५ रोजी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आरोपी तरुणावर कठोर कारवाई व्हावी तसेच शाळेची मान्यता रद्द व्हावी, या गुन्ह्याचा खटला फास्ट ट्रॅक वर चालविण्यात यावा आणि मुख्याध्यापिका यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केली होतो. शाळा व्यवस्थापन आणि संस्था जबाबदार असल्याने त्या सर्व दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती. याप्रकरणी शिक्षण विभागाने नेमलेल्या चौकशी समितीने अहवाल सादर केला असून त्या अहवालात प्रथम दर्शनी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सिसिलिया या जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे सिसिलिया यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.