पनवेल | उर्दू पुस्तक वाचायला नाही आले म्हणून त्या राक्षसांनी एकाला गोळ्या घातल्या...नाव विचारुन विचारुन ते एकेकाला मारत होते...या हल्ल्यात कामोठे येथील दिलीप देसले यांचा जीव गेला आहे. तर घाबरुन चहाच्या टपरीत लपून बसलेल्या सुबोध पाटील यांच्या मानेला गोळी चाटुन गेली. ‘पृथ्वीवरच्या स्वर्गा’त त्या राक्षसांनी तब्बल २८ निष्पाप नागरिकांचा जीव घेतला होता.जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.
पर्यटनासाठी गेलेल्या २८ जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश असून अनेकजण जखमी आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील दिलीप देसले यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तर कामोठे येथील सुबोध पाटील आणि त्यांची पत्नी माणिक पाटील जखमी झाल्या आहेत. पाटील दाम्पत्य ४० जणांच्या ग्रुपसह जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेले होते.
यावेळी झालेल्या हल्ल्यात हे दाम्पत्य सापडले. या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांना इंडियन आर्मी ९२ बेस हॉस्पिटल पेहलगाम इथे भरती करण्यात आले आहे. या जखमी पर्यटकांची मध्ये जाऊन धनंजय जाधव व पुजा मोरे जाधव यांनी भेट घेतली. सुबोध पाटील यांनी घडलेला सगळा थरात सांगितला. यावेळी अंगावर काटा आणणारा त्यांचा हा अनुभव होता दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीरमधील नागरिक व पुणे येथील पर्यटक धनंजय जाधव आणि पुजा धनंजय जाधव यांनी दहशतवाद्यांच्या विराधात मोर्चा काढत निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजीदेखील केली. दरम्यान, पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.