श्रीवर्धन | श्रीवर्धन तालुक्यात कारिवणे वरचीवाडी येथील शेतकर्यांच्या गोठ्यातील बकर्यांवर बिबट्याने हल्ला केला. यातील एका बकरीला त्याने खिडकी बाहेर खेचत फडशा पाडल्याची घटना घडली आहे. या प्रकाराने कारिवणे परिसरात घबराट पसरली आहे. कारिवणे (वरची वाडी) येथील केशव राजाराम जोशी यांनी गोठ्यात त्यांची गुरे व बकर्या बांधून ठेवल्या होत्या.
मंगळवारी, २३ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने खिडकीतून गोठ्यात शिरकाव केला आणि बोकडावर हल्ला केला. त्याला खिडकीतून बाहेर काढत त्याचा फडशा पाडला. केशव जोशी हे सकाळी बकर्या गुरे सोडण्यास गोठ्यात गेले असता त्यांना बोकडाचे अवशेष पहायला मिळाले. त्यांनी याची माहिती गावकर्यांना दिली. यानंतर त्यांनी श्रीवर्धन येथील वनविभागाच्या अधिकार्यांना संपर्क करून घटनास्थळी बोलविण्यात आले.
वनपाल थळे यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी गाईवर हल्ला करून तिला ठार मारल्याची घटना घडली होती. गावांतील पाळीव चार कुत्रे तसेच ३ वासरे बिबट्याने फस्त केले होते. मानवी वस्ती वेळोवेळी बिबट्याच्या पाळीव जनावरांवरील हल्ल्यामुळे या परिसरामध्ये बिबट्याची दहशत निर्माण पाहायला मिळत आहे.