अलिबाग | रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यावर्षी यावर्षी ५ हजार ७४७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून तब्बल ८४ कोटी ६० लाख रुपयांचा नफा कमावला आहे. बँकेने २०२४-२५ या कालावधीत ३ हजार १८९.८२ कोटी इतक्या ठेवी आणि २ हजार ५४८.३० कोटींचे कर्ज वितरण केले आहे. आगामी वर्षामध्ये १० हजार कोटींचा टप्पा ओलांडणार, असा विश्वास बँकेचे सीईओ मंदार वर्तक यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठक पार पडली.
सुरुवातीला काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच म्हसळा तालुक्यातील बँकेचे संचालक संतोष पाटील यांच्या दोन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, याबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील, उपाध्यक्ष सुरेश खैरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक आणि बँकेचे संचालक उपस्थित होते.
या वर्षात बँकेने जिल्हाधिकार्यांकडून दिलेले.पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतही उल्लेखनीय कामगिरी करत उद्दिष्टाची शंभर टक्के पूर्तता केली आहे. बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, यावर्षी बँकेने अनेक नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत मागील वर्षाच्या तुलनेत अधिक कर्ज वाटप करून शहरी आणि ग्रामीण भागातील लघु व्यावसायिकांना मदत करण्यात आली आहे. ठेवी व कर्ज वितरणाच्या प्रमाणातही बँकेने सातत्य राखत ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे.
तसेच बॅकेच्या या यशस्वी वाटचालीबाबत प्रामाणिकपणे काम करणार्या कर्मचारी, अधिकार्यांचे कौतुक केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी, आगामी वर्षामध्ये बँकेचा व्यवसाय १० हजार कोटींच्या टप्प्याकडे वेगाने वाटचाल करेल. आम्ही तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत बँक म्हणून नावारूपाला येण्याचे लक्ष्य ठेवले असे म्हटले आहे.
डिजिटल बँकिंग, डेटा अॅ नालिटिक्स, आणि ग्राहक- केंद्रित सेवा यांद्वारे आम्ही ग्रामीण बँकिंगचे भविष्य उज्वल करू आणि बँकेने २०२४- २५ हे आर्थिक वर्ष केवळ आकडेवारीच्या पातळीवरच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी, रोजगारनिर्मिती, आणि आधुनिकतेच्या दिशेने भक्कम पाऊल टाकत एक समृद्ध आर्थिक प्रवास घडवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.