गोवंश हत्येनंतर कर्जतमध्ये तणाव; एकजण अटकेत

By Raigad Times    25-Apr-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | तालुक्यातील सावेळे गावात एका मुस्लीम तरुणाच्या घरात गोवंश कापण्यात आल्यानंतर काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी बजरंग दल आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने कर्जत पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करण्यात आली. सावेले येथील अकलाज पटेल हा तरुण गोवंश हत्या करून त्यांचे मांस विक्री करीत असल्याची खबर गोरक्षक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कार्यकर्त्यांना होती.
 
गुरुवारी दुपारी त्या तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आल्यावर गोरक्षक तरुण यांनी आक्रमक भूमिका घेतली. यानंतर पोलिसांनी गायीची कत्तल करणार्‍या तरुणाला तत्काळ अटक करून परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.
 
बजरंग दलाचे संयोजक नितीन पवाळी तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे अमोल ओसवाल आणि मयुरेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कर्जत परिसरातील तरुण एकत्र आले होते. पोलिसांना गुन्हा दखल करण्याची कार्यवाही सुरू असून बंदी असलेली गाय कापण्यात आल्याचे पुरावे पाहून संबंधित तरुणावर कठोर कारवाई होईल, असे आश्वासन दिले आहे.