मुंबई | राज्याच्या सागरी जलक्षेत्रात लहान आकाराचे मासे पकडणे आणि त्याच्या खरेदी विक्रीवर बंदी आहे. त्यामुळे या बंदीचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी दंडात्मक कारवाईची तरतूदही करण्यात आली आहे.
पारंपरिक माच्छिमारांच्या हिताचे संरक्षण आणि शाश्वत मासेमारीसाठी केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेने ५८ प्रजातींच्या किमान कायदेशीर आकारमानाबाबत शिफारस केली आहे. त्याप्रमाणे लहान आकाराचे मासे पकडणे टाळण्यासाठी कोवळ्या माशांची मासेमारी करण्यावर कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या २ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या आदेशाने ५४ प्रजातीच्या किमान कायदेशीर आकारमानाचे विनियमन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ (सुधारीत २०२१) कलम १७(८)(अ) व (ब) नुसार लहान आकाराच्या माशांची मासेमारी बंदीच्या उल्लंघनासाठी दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. तसेच याविषयी जनजागृती करण्यासाठी मासळी बाजारांमध्ये फलकही लावण्यात येणार आहेत.