अलिबाग | रायगड जिल्हा परिषदेतील ५ कोटी ३५ लाख ३४ हजार ७७१ रुपयांच्या वेतन घोटाळ्यातील फरार महेश गोपीनाथ मांडवकर याच्या नातेवाईकांचेही अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.
मांडवकर याने घोटाळ्यातील ८० लाख ७८ हजार ९९२ रुपये एवढी रक्कम नातेवाईकांच्या विविध बँक खात्यात जमा केल्याने जयेश मांडवकर, राजेश नाईक व लता नाईक यांचे अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश, एस.डी. भगत यांनी फेटाळून लावले आहेत. जिल्हा सरकारी वकील अॅड. संतोष पवार यांनी याप्रकरणात सरकार तर्फे जोरदार युक्तिवाद केला.
महेश गोपीनाथ मांडवकर याने आपल्या खात्यात गैरवापर करून सरकारी निधी जमा केला होता, ज्यातून त्याच्या नातेवाईकांनी रक्कम काढली होती आणि त्याचा थेट फायदा गुन्ह्यात झाला होता याची कल्पना होती. त्यामुळे त्यांच्या कोठडीची आवश्यकता असून, त्यामुळे या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती उघड होईल, असा युक्तिवाद अॅड.संतोष पवार यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने जयेश मांडवकर, राजेश नाईक व लता नाईक यांचे अटकपूर्व जामीन फेटाळून लावले आहेत.