रिलायन्स प्रकल्पाविरोधात उपोषण अखेर यशस्वी , आंदोलकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा

लेखी ओशासनानंतर उपोषण स्थगित

By Raigad Times    07-Apr-2025
Total Views |
pali
 
पाली/बेणसे | रिलायन्स नागोठणे संलग्न नवीन प्रकल्पाविरोधात बेणसे झोतीरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समिती आक्रमक झाली होती. आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येथील शेतकरी, मत्स्यव्यवसायिक, स्थानिक भूमिपुत्र, यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.
 
अखेर उपोषणाच्या चौथ्या दिवशी रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, बेणसे झोतीरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समितीचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन पेण तहसीलदार तानाजी शेजाळ व नागोठणे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषस्थळी जाऊन लेखी ओशासन दिल्याने बेमुदत आमरण उपोषण स्थगित करण्यात आले.
 
रिलायन्स नागोठणे कंपनी संलग्न बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जात आहे. अशातच येथील स्थानिक, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, सुशिक्षित बेरोजगार, पशुपालक आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची दखल रिलायन्सने घ्यावी यासाठी आमरण उपोषणाचा पर्याय अवलंबिण्यात आला होता. विशेष म्हणजे लढाऊ भूमिकेने आपल्या जमिनी वाचविण्यासाठी तसेच शेतजमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी तसेच इतर महत्वपूर्ण आठ मागण्या घेऊन संविधानिक व लोकशाही मार्गाने उभारलेल्या लढ्याला यश आल्याचे दिसून आले.
 
बेणसे सिद्धार्थ नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ आमरण उपोषणास बसलेल्या बेणसे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्मिता यशवंत कुथे, कल्पना अडसुळे, योगेश मंगेश अडसुळे, सचिन कुथे या चार उपोषणकर्त्याना विभागातील शेतकरी व स्थानिक भूमिपुत्रांनी जोरदार पाठिंबा दर्शविला होता.
 
त्यामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळाले. दरम्यान पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या उपस्थितीत स्थानिकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने लवकरात लवकर रिलायन्स व्यवस्थापनाने मागण्यांच्या अनुषंगाने सकारात्मकतेने कृती करावी अशी मागणी उपोषणकर्ते, बेणसे झोतीरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे, अन्य पदाधिकारी व शेतकर्‍यांनी केली .
 
यावेळी पार पडलेल्या बैठकीत ई.डी. पी.एल लाईन एक वर्षांपासून लिकेज झाल्याने शेतकर्‍यांचे, मच्छिमार व पशुपालक यांच्या व्यवसायावर केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे व होत आहे. या नुकसानग्रस्त घटकांची आर्थिक नुकसान भरपाई देण्याबाबत च्या मुद्यावर सकारात्मकता चर्चा झाली, तसेच नवीन प्रकल्पाच्या मातीच्या भरावामुळे सर्व व्यवसायिक व शेतकरी यांचेकायमस्वरूपी नुकसान होणार असल्यामुळे या घटकाला उदरनिर्वाहाच्या दृष्टीने शिक्षण व गुणवत्तेनुसार कायमस्वरूपी नोकरी याबाबत सकारात्मक चर्चा झाली, तसेच बी एस सी, डिग्री, डिप्लोमा व आयटीआय व फायर मॅन यांना सध्या चालू असलेल्या रिलायन्स कंपनीत कामाला कायम स्वरूपी सामावून घेण्याबाबतच्या मागणीबाबत वरिष्ठ स्थरावर चर्चा सुरू असून यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.
 
तसेच शेतकर्‍यांची पूर्वापार चालू असलेली वहिवाट मोकळी सोडून जाण्या-येण्यास रस्ता देणार असल्याचे रिलायन्स व्यवस्थापनाने यावेळी मान्य केले. कंपनीने लाखो ब्रास माती भराव व दगड टाकून ठेवल्याने दोन महिन्यात पाऊस पडून शेतीत माती दगड जाऊन नुकसान होणार आहे.
 
यामध्ये शेतकर्‍यांचे पशुधन नष्ट होणार आहे, शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी, या मुद्यावर देखील सकारात्मक चर्चा झाली. बौद्धवाडी समोर कोणतीही संरक्षण भिंत घालू नये या मुद्यावर बराच वेळ चर्चा होऊन अखेर सदर विषय तूर्तास प्रलंबित ठेवत असल्याचे रिलायन्स व्यवस्थापनाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
 
सदरचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सिद्धार्थनगर बौद्धवाडीसमोर गेट ठेऊन संघर्ष समितीला (महिलांना) मेस व खानावळ देण्याच्या मुद्यावर सकारात्मक चर्चा झाली. मातीच्या भरावाने बेणसे झोतीरपाडा व अन्य नागोठणे विभागात महापूर परिस्थिती अधिक उद्भवण्याची भीती आहे. आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा प्रशासन यांनी उपाययोजना करावी. या सर्वच मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने आमरण उपोषण स्थगित करण्यात आले.