मुंबई | महाराष्ट्रातील कोकण भागातील आंब्यांना आता ‘जीआय’ कवच मिळाले आहे. यामुळे बनावट आंबे सहज ओळखता येणार आहेत. कोकणातील हापूस आंब्याच्या उत्पादकांनी जवळपास १ हजार ८४५ जीआय टॅग मिळवले आहेत. देशातील वैयक्तिक उत्पादनांसाठी जारी केलेल्या टॅगची ही सर्वाधिक संख्या असेल, असे हापूस अंबा उत्पादक विक्रेता सहकारी संघाचे सचिव मुकुंद जोशी यांनी सांगितले.
‘इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. हापूस आंब्याचा जीआय टॅग कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणार्या फळांसाठी राखीव आहे. रसाळ चव आणि रंगांसाठी ओळखल्या जाणार्या आंब्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही आंब्यांना हापूस टॅग वापरण्याची परवानगी नाही.
फळ उत्पादक आणि विक्रेत्यांची सहकारी संस्था असलेल्या संघाने कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या इतर प्रदेशांमध्ये देखील पिकवल्या जाणार्या आंब्यांसाठी वापरल्या जाणार्या हापूस या संज्ञेच्या उल्लंघनाविरुद्ध कारवाई सुरू केली आहे, अशी माहितीही जोशी यांनी दिली.
हापूस आंब्यांच्या पेटीवर क्युआर कोड
"जीआय (भौगोलिक संकेत) केवळ एका विशिष्ट प्रदेशात उत्पादित होणार्या कृषी मालांना लागू होते. अशा प्रकारे जर ते दुसर्या प्रदेशातून मिळवलेल्या वस्तूंचे ब्रँडिंग करण्यासाठी वापरले गेले तर ते उल्लंघन ठरेल”, असे जोशी म्हणाले. संघ त्यांच्या सदस्यांना आणि सहकारी शेतकर्यांना त्यांच्या शेतांसाठी जीआय टॅग अर्ज करण्यास आणि मिळविण्यास मदत करत आहे.
"आमच्या प्रदेशातून मिळवलेल्या आंब्याच्या पेट्यांमध्ये क्यूआरकोड स्कॅनिंग आहेत ज्यामुळे शेतीची माहिती आणि जीआय टॅग मिळू शकतो”, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
फळांच्या गुणवत्तेची खात्री करण्याकरता तंत्रज्ञानाचा वापर
राज्यातील हापूस उत्पादकांनी बाजार समित्या आणि राज्य पणन मंडळाला हापूस ब्रँडचे उल्लंघन रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या खरेदीदारांना ते खरेदी करत असलेल्या फळांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
रिजनल रूट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक निशिकांत पाटील आणि हर्षल जरांडे म्हणाले की ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील २१ शेतकर्यांकडून आणि रत्नागिरी जिल्ह्यातील १२ शेतकर्यांकडून हापूस आंबा खरेदी करत आहेत.
शेतकर्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा
आमचे उद्दिष्ट शेतकरी आणि ग्राहकांमधील अंतर कमी करणे आहे. शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनाचे मूल्य मिळायला हवे आणि ग्राहकांना सर्वो त्तम उत्पादन मिळणे गरजेचे आहे, असं ते म्हणाले. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांच्या बॉक्समध्ये कोड आहेत. यामुळे ग्राहकांना आंबा जिथून घेतला जातो त्या बागेची माहिती मिळते.
महाएफपीसीच्या आंबा महोत्सवात, पेट्यांमध्ये संपूर्ण ट्रेसेबिलिटी असते, यामध्ये कापणीची तारीख आणि पॅकिंग सारख्या तपशीलांचा समावेश असतो आणि त्यांच्या क्यूआर कोड एन्क्रिप्टेड असतो. महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात म्हणाले की, शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा यासाठी आमचे ध्येय आहे.