सुधागड-पाली | गेल्या काही दिवसांपासून दुषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्यामुळे हैराण झालेल्या पालीकरांना दिलासा मिळाला आहे. पाली नगरपंचायतीने दूषित पाण्याच्या समस्येकडे तातडीने लक्ष देत, पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून उन्हेरे धरणातून अंबा नदीत पाणी सोडण्याची व्यवस्था केली.
त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायत हद्दीत मागील काही दिवसांपासून दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आरोग्यास हानी पोहोचवणारे हे पाणी प्यावे लागत असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता वाढली होती. परिणामी, अनेक ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी विकत घ्यावे लागत होते.
पाली नगरपंचायतीने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देत पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून उन्हेरे धरणातून आंबा नदीत पाणी सोडण्याची व्यवस्था केली. यामुळे दूषित पाणी आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्याची समस्या सोडवण्यात यश आले असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपंचायतीच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे पालीकरांना शुद्ध पाणी मिळाल्याने आरोग्याच्या धोक्यांपासून सुटका झाली आहे.
नागरिकांनी नगरपंचायतीच्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले असून, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन आम्ही तातडीने उपाययोजना केली आहे.
भविष्यात अशा समस्या पुन्हा उद्भवू नये म्हणून आम्ही दीर्घकालीन उपाय योजनेवर काम करत आहोत. नागरिकांचा विश्वास आणि समाधान हेच आमचे प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रीया पाली नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा व आरोग्य सभापती प्रतीक्षा सुबोध पालांडे यांनी दिली आहे.
पाटबंधारे विभागाच्या सहकार्याने उन्हेरे धरणातून पाणी आंबा नदीत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आमचे प्राथमिक उद्दिष्ट नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे आहे. त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. - विद्या येरुणकर, मुख्याधिकारी, नगरपंचायत पाली