चेन्नई सुपरफास्ट एसप्रेसवर दगडफेक , कर्जत येथील तरुणी जखमी; गुन्हा दाखल

By Raigad Times    07-Apr-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | कल्याण आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक दरम्यान चेन्नई सुपरफास्ट एसप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना ४ एप्रिल रोजी घडली. या दगडफेकीत एसप्रेसमधून प्रवास करणारी कर्जत येथील २४ वर्षीय तेजस्विनी बाळाराम भोईर ही तरुणी जखमी झाली आहे.
 
तरुणीला कर्जत रेल्वे स्थानकात उतरवून तात्काळ कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तरुणीच्या डोयाला दगडाचा मार लागल्याने ती जखमी झाली आहे. ही घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी स्टेशनदरम्यान घडली आहे. कर्जत साईनगर दहिवली येथील राहणारी पीडित तेजस्विनी बाळाराम भोईर ही तरुणी ठाणे येथे कामानिमित्ताने गेली होती.
 
दरम्यान नेहमीप्रमाणे रात्री तेजस्विनी ठाणे रेल्वे स्थानकातून घरी परतण्यासाठी चेन्नई सुपरफास्ट एसप्रेसमध्ये बसून निघाली असताना विठ्ठलवाडी स्टेशन येण्यापूर्वी एसप्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली. त्यातील एक दगड ट्रेनमध्ये बसणार्‍या तेजस्विनी भोईर हिच्या डोयाला लागल्याने ती जखमी झाली. सुरुवातील ट्रेनमध्ये असणार्‍या प्रवासी नागरिकांनी चैन खेचून ट्रेन अंबरनाथ रेल्वे स्थानकात थांबवली.
 
यावेळी तेजस्विनीवर रेल्वे विभागाकडून प्राथमिक उपचार करून पुढील प्रवास करून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यास सांगितले. कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तरुणीचा जबाब नोंदवून घेत अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार वर्ग करण्यात आलेली आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात कालच्या सुमारास दिवस भरात ट्रेनवर दगडफेकीच्या तीन घटना घडल्याचे सांगण्यात आले होते.
 
ही दगडफेक कुठल्या कारणाने करण्यात आली हे समजले नसले तरी कल्याण आणि उल्हास नगर रेल्वे परिसरात राहत असलेल्या झोपडीधारकांवर रेल्वेने कारवाई केली आहे. त्यातूनच हा प्रकार घडला असावा. असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. मात्र धावत्या ट्रेनवर आणि एसप्रेसवर दगड फेकून मारण्याच्या घटना या नवीन नसून मध्य रेल्वे प्रशासनाचे याबाबत गांभीर्य नसल्यानेच अशा घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत. परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे आता तरी रेल्वे प्रशासन याबाबत कठोर कारवाई करणार का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.