अलिबाग | अलिबाग तालुक्यातील रेवस ते अलिबाग मार्गावर रविवारी (६ एप्रिल) दुपारच्या सुमारास भलामोठा वृक्ष कोसळला. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या दुर्घटनेत दुचाकीवरून जाणारे दोघे किरकोळ जखमी झाले. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
रस्त्याच्या कडेला असलेले झाड मुळापासून उन्ळून रस्त्यावर पडले. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तरीही दुचाकीवरून जाणार्या दोघांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक कनकेश्वर मार्गे वळवण्यात आली होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी या घटनेची तत्काळ दखल घेतली. झाडे तोडणारे कामगार आणि जेसीबीच्या सहाय्याने तासाभराच्या प्रयत्नानंतर झाड बाजूला केले आणि वाहतूक पूर्ववत सुरू झाली. यात थळ ग्रामपंचायतीने महत्वपूर्ण सहकार्य केले.
अलिबाग रेवस मार्गावर असे अनेक जुनाट वृक्ष कोसळण्याच्या स्थितीत आहेत. यामुळे मोठा अपघात होण्याची भीती आहे. हे वृक्ष हटवण्याची मागणी प्रवाशांकडून होते आहे. परंतु त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही. पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला हा रस्ता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला आहे. या विभागाचे कार्यालय मुंबईत असल्याने या समस्येकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न उपसथित होत आहे.