पाली/बेणसे | भावाच्या मेहुण्यानेच घरातील दागिण्यांची हातसफाई केल्याची घटना सुधागड तालुक्यातील परळी येथे घडली आहे. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. राहुल तुकाराम काळभोर हे परळी, ता. सुधागड येथे आपल्या कुटुंबासोबत राहतात.
त्यांच्या घरातील कपाटातून २ तोळे २ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले चोरीला गेले होते. त्यानंतर त्यांनी पाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत त्यांनी आपल्या भावाचा मेहुणा ऋषिकेश रामचंद्र मांडवकर (रा. उंबरवाडी, माणगाव बुद्रुक ता. सुधागड) यांच्यावर संशय व्यक्त केला.
पालीचे पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी, पोलीस हवलदार दीपक पाटील, पोलीस शिपाई अजित लामखेडे, भापकर व बजबळकर यांनी सदर संशयित फरार चोराचा तपास चालू केला. ऋषिकेश मांडवकर हा खोपोलीत असल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याला अटक करून त्याच्याकडून १ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.