खोपोलीत तरुणाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या , ऑनलाईन रमीच्या नादात झाला कर्जबाजारी!

By Raigad Times    09-Apr-2025
Total Views |
 khopoli
 
खोपोली | खोपोली शहरातील एका ३२ वर्षीय तरुणाने स्वतःला रेल्वेखाली झोकून देत, आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (७ एप्रिल) घडली. सुनील नडवीरमणी असे या तरुणाचे नाव असून, ऑनलाईन रमीच्या नादात कर्जबाजारी झाल्याने त्याने जीवन संपविल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, खोपोली शहरामधील साईबाबा नगर येथील ३२ वर्षीय सुनील नडवीरमणी याने ७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून ३० मिनिटांच्या खोपोली ट्रेनखाली उडी मारुन जगाचा अखेरचा निरोप घेतला. सुनील ऑनलाईन रमीच्या आहारी गेला होता. या नादात तो कर्जबाजारी झाला होता.
 
७ एप्रिलला रात्री तो औषध आणायला जातो सांगून घरातून बाहेर पडला. तो घरी परत आलाच नाही. शोधाशोध केली असता सुनीलचा मृतदेह खोपोली रेल्वे स्थानकामध्ये आढळून आला. डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने, सुनीलने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, सुनीलच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तो राहत असलेल्या साईबाबा नगरमध्ये शोककळा पसरली आहे.