नवीन पनवेल | आजीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करण्याच्या उद्देशाने १७ वर्षीय नातवाने आजीची टॉवेलने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना पनवेल तालुक्यातील टावरवाडी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, खुनी मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यात येणार आहे.
यातील मृत वृद्ध महिलेचे नाव जानकी कान्ह्या निरगुडा (वय ७४) असे आहे. जानकी निरगुडा या ३ एप्रिल रोजी सकाळी टावरवाडी येथून एकवीरा देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी टावरवाडी ते धामणीकडे जाणार्या डोंगराळ पायवाटेने निघाल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या. त्याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
तपासादरम्यान मालडुंगे गावच्या हद्दीत टावरवाडी ते धामणीकडे जाणार्या डोंगराळ पायवाटेलगत असलेल्या झुडपात ७ एप्रिल रोजी यांचा मृतदेह सापडला. यावेळी त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यांच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र आणि चांदीचे बाजूबंद चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांची हत्या करत, खुनी पसार झाला होता.
सुरुवातीला याप्रकरणी अज्ञातावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासात ही हत्या जानकी निरगुडा यांच्या १७ वर्षांच्या नातवानेच केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ७ एप्रिल रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास त्याच्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.