‘बायोमेट्रीक फेस रिडिंग’ हजेरीला राजिपच्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांचा विरोध

By Raigad Times    09-Apr-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | आरोग्य विभागातील क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांना बायोमेट्रीक, फेस रिडींग हजेरी १ एप्रिलपासून सक्तीची करण्यात आली आहे. या प्रणालीला रायगड जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी त्याला विरोध केला आहे. रायगड जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी सोमवारी (७ एप्रिल) जागतिक आरोग्य दिनी आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
 
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या नवी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी बायोमेट्रीक हजेरीतील दोषांचा आणि ते वापरणे कसे चुकीचे आहे? याचा पाढाच वाचला आहे. यासंदर्भात आरोग्य कर्मचार्‍यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार असल्यास सदरची प्रणाली कशी वापरावी? काम संपल्यानंतर एकदा बाहेर पडल्यावर जर आरोग्याची असुविधा निर्माण झाल्यास काय करावे? काम संपल्यानंतर प्रणालीमधुन बाहेर पडल्यावर कर्मचारी परत कामावर येणार नाही. ही प्रणाली लागू केल्यास आरोग्य कर्मचारी म्हणून आरोग्य सेवा देता येणार नाही, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.कामाचे तास निश्चित नाहीत.
 
२४ तास संस्था सुरु ठेवण्याकरिता आवश्यक मनुष्यबळाची तरतूद नाही, आवश्यक मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत, साधन सामग्री उपलब्ध नाही, सुरक्षितता उपलब्ध नाही असे असतानांही वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करत अत्यावश्यक सेवा देत असलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांवर अविश्वास दाखवून इतर कुठल्याही विभागास सक्तीची नसलेली बायोमेट्रीक व फेस रिडींगनुसार हजेरी सक्तीने करणे हे चुकीचे वाटते.
 
त्यामुळे जोपर्यंत वरील गोष्टीबाबत शासनाकडून स्पष्टता येत नाही तोपर्यंत आम्ही या सक्तींस तीव्र विरोध करत असून याचा स्वीकार करणार नाही, असे पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. आरोग्य कर्मचार्‍यांनी मांडलेले मुद्दे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी समजून घेतले. याबाबत शासनाला अवगत केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल खैरनार, महिला अध्यक्ष संगीता चव्हाण, सचिव प्रसाद म्हात्रे, सरचिटणीस राजन कडू, कार्याध्यक्ष शरद बडे, कोषाध्यक्ष गणेश शिरसाट, तृप्ती पाटील, सचिन पाटील, घुले, संदीप बाळसराफ यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.