महाड-नांगलवाडी येथे एकावर जीवघेणा हल्ला , मीटरच्या जुन्या वादातून शॉकप्सर घातला डोक्यात

10 Apr 2025 13:02:24
 mahad
 
महाड | तालुक्यातील नांगलवाडी येथे जुन्या वादातून एकाला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील शुभ लाभ सोसायटी येथे घडली असून घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले होते. नारायण रामचंद्र साळुंखे (रा.शिवथर ता.महाड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी व जखमी यांचा पिण्याच्या पाण्यावरुन जुना वाद आहे.
 
याच वादातून चंद्रकांत तुकोबा कराडे (रा. तुळसण, सातारा) याने शॉकप्सरचा पाईप डोक्यात घालून एकाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ८ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात संभाजी दिगंबर मोरे (रा. कडेगाव, सांगली) जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
 
हल्लेखोर आणि जखमी हे दोघेही सध्या महाड तालुक्यातील नांगलवाडी येथील शुभ लाभ सोसायटी येथे राहत असून, किरकोळ वादातून दोघांमध्ये मोठे भांडण झाले आणि भांडणाचे रूपांतर शेवटी हाणामारीत झाले. याप्रकरणी चंद्रकांत कराडे याच्याविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0