समीर शेडगे यांचा शिवसेना तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा , राष्ट्रवादीत करणार प्रवेश

11 Apr 2025 20:18:56
 roha
 
रोहा | रोहे शहर व ग्रामीण भागातील विकास कामे मार्गी लागावी म्हणून आपण विकासाच्या प्रवाहात राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असून शिवसेना तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेली ८ वर्षे मी शिवसेनेत काम केले.
 
मला माजी मंत्री अंनत गीते, सुभाष देसाई व असंख्य शिवसैनिकांनी फार मोलाचे सहकार्य केले. ते मी कदापी विसरू शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी तटकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतर शेडगे अस्वस्थ होते.
 
roha
 
विकास हाच मुद्दा आपल्या नजरेसमोर ठेऊन शेडगे यांनी ‘घरवापसी’चा निर्णय घेतला. त्यानंतर शेडगे अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने खा. सुनिल तटकरे यांच्या संपर्कात आले. बुधवारी त्यांनी आपला पदाचा राजीनामा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याकडे सुपूर्द केला. १३ एप्रिल रोजी प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ते त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षात पक्षप्रवेश करणार आहेत.
 
यापुढे आपण खा. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढविण्यासाठी आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिक काम करणार असल्याचे शेडगे यांनी म्हटले आहे. यावेळी उपतालुकाप्रमुख महादेव साळवी, तालुका महिला संघटक नीता हजारे, अ‍ॅड.हर्षद साळवी, आदित्य कोंडाळकर, मजहर सिद्दीक, बिलाल मोरबेकर, सिद्धेश शेडगे, गणेश हजारे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0