उरण | जेएनपीएमुळे विस्थापित झालेल्या हनुमान कोळीवाडा गावाचे योग्य पुनर्वसन झाले नसल्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ १४ एप्रिल रोजी उरण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर हनुमान कोळीवाडा गावातील काही ग्रामस्थांनी या आंदोलनाशी गावाचा काहीही संबंध नसल्याचे प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यामुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे.
या ग्रामस्थांच्या मते हनुमान कोळीवाडा गावचे पुनर्वसन अपूर्ण आहे ते पूर्ण करावे ही मागणी सर्वांचीच आहे. परंतु ग्रामपंचायत बेकादेशीर आहे हे पूर्ण चुकीचे व हास्यास्पद आहे. कारण गेल्या सहा पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामपंचायत मतदान या ठिकाणी झालेले आहे. मात्र ग्रामपंचायतीमध्ये ज्यांनी अफरातफर आणि गैरव्यवहार केले, त्यासंदर्भात शासनाकडून गुन्हे नोंदवून वसुलीच्या केसेस न्यायप्रविष्ट आहेत अशाच लोकांनी हे उपोषण गावावर लादले आहे.
ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार ठराव करून शासनाने गेली ३३ वर्ष गावाचा कारभार हा ग्रामपंचायत मार्फत चालवला जात असून गावातील विकासाच्या बरोबर नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुख सोयी प्रशासन व जेएनपीटी कडून ग्रामपंचायतीला पुरविल्या जात आहेत. गावच्या पुनर्वसना नंतर तत्कालीन गावच्या कार्यकर्त्यांनी दिनांक २० जुन १९८६ रोजी शासनाकडे ठराव व विनंती करून स्वतंत्र ग्रामपंचायत मागणी नुसार सन १९८७ रोजी नवीन गावात स्वतंत्र गाव म्हणून हनुमान कोळीवाडा घोषित केली.
ज्यांना शासनाने मुदत संपण्यापूर्वीच अपात्र ठरवून सरपंच पदावरून बडतर्फ केले व त्यांच्याशी संबंधित काही लोक यांच्याकडून आपले गुन्हे माफ करण्यात यावेत व ग्रामस्थांचे लक्ष या गुन्ह्यांपासून दुसरीकडे वळविण्यासाठी हे उपोषणाचे नाटक करत असल्याचे या ग्रामस्थांचा आरोप आहे. पाणी कमिटी चालवणार्या काही महिलांच्या गटाकडून सतत सतत प्रशासनाला वेठीस धरून आंदोलन केले जात आहे.
या अमरण उपोषणामध्ये संपूर्ण गावाचा कोणताही उल्लेख संबंध नाही. स्वार्थापोटी आणि प्रशासनाला गावातील नागरिकांना वेठीस धरून त्रास देऊन सदरच्या संघटना, कमिटी या वैयक्तिक अमरण उपोषण करीत आहेत. यामध्ये गावाचा कोणताही संबंध नाही. हनुमान कोळीवाड्यातील कायमस्वरूपी शेतकरी प्रकलग्रस्त विस्थापित श्री. अनंत रामजीवन परदेशी यांचे भाऊ यांची १० कटंबे आणि ४७ सदस्य हे ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून करधारक असून नियमित घरपट्टी पाणीपट्टी भरत आहेत.
लोकसभा विधानसभेत त्याच्या कुटुंबाने मतदान करून हक्क बजावला. या सूड भावनेने १ जानेवारी २५ पासून गेली ९० दिवस पाण्यापासून या गावातील बेकायदेशीर पाणी कमिटीने पाण्यासारख्या जीवनावशक गोष्टी पासून वंचित ठेवलेले आहे. असे बेकायदेशीर कृत्य करणार्या लोकांना गावाचा पाठिंबा नाही असे पत्रक काढले आहे. या पत्रकावर शिवसेना शाखाप्रमुख कमलाकर कोळी, भाजपा गाव अध्यक्ष शाम कोळी, आई एकविरा मच्छिमार सोसायटी चेअरमन आणि माजी सरपंच गौरव कोळी, माजी सरपंच पांडूरंक कोळी, माजी सरपंच जयंत कोळी, माजी सरपंच जयश्री कोळी या लोकांनी सह्या केल्या आहेत.