नांदगाव | मुरूड तालुयातील नांदगावसह यशवंतनगर पंचक्रोशीतही आलेल्या मच्छरांच्या धाडीने येथे आलेल्या पर्यटकांना देखील सोडलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे आधीच नागरिक हैराण झाले असताना काळ्या रंगाच्या छोट्या मच्छरांची फार मोठी पैदास झाली असून हे मच्छर दिवसाढवळ्याही माणसांवर सरळ सरळ हल्ला करीत आहेत.
शरीराच्या उघड्या भागांवर बसून ते चावत असल्याने स्थानिकांसह पर्यटकांनाही त्यांच्या मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शनिवार, रविवारला लागून सोमवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त शाळा, कार्यालयांना सुट्टी असल्याने येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनीही मच्छरांच्या त्रासामुळे आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. मार्च महिन्यातील ढगाळ वातावरणामुळे या मच्छरांची मोठी पैदास झाली होती.
त्यानंतर काही दिवसांत वातावरणात बदल झाल्याने त्यांचे प्रमाण कमी झाले होते परंतु काही दिवसांत पुन्हा झालेल्या ढगाळ वातावरणामुळे त्यांची पुन्हा मोठी पैदास झाली आहे. सद्या येथील नारळ सुपारीच्या बागांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. अशा थंड व ढगाळ वातावरणात परत एकदा त्यांची मोठी पैदास झाल्याचे निदर्शनास येत आहे. या मच्छरांमुळे, डेंग्यू, मलेरिया सदृश रोगांचे विषाणू ंहवेत पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.