कलेक्टर शेतकरी असेल तर... शेतकर्‍यांना मिळाला पोर्टेबल सोलार पंप

16 Apr 2025 12:26:56
alibag
 
अलिबाग | जिल्ह्याचा कलेक्टर जर शेतकरी असेल तर शेतकर्‍यांसाठी काय करु शकतो? याचे उदाहरण रायगडात पहायला मिळते आहे. दुसर्‍याच्या शेतात जेव्हा इमानदारीने कसणारे आदिवासी शेतकरी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पाहिले, त्यांनी त्यांची समस्या जाणून घेतली आणि या शेतकर्‍यांच्या जीवनात "पोर्टेबल सोलार पंप” उपलब्ध करुन देत, नवीन शेतक्रांतीला सुरुवात झाली.
 
४० दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रोहा तालुक्यातील किल्ला या गावाला भेट दिली असता, आदिवासी शेतकरी सलग ४०० एकर क्षेत्रावर दोडका, कारली, भेंडी, कलिंगड यांसारख्या निर्यातक्षम भाजीपाला पिकांची शेती करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, ही शेती डिझेल पंपांच्या माध्यमातून सिंचन केली जात होती. यासाठी ४५ डिझेल पंपांचा वापर होत होता. यासाठी एका हंगामात सुमारे ६५ लाख रुपयांचे डिझेल खर्च होत होते आणि वर्षातून दोन हंगामांमध्ये हा खर्च तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांपर्यंत जात होता.
 
शेतीकरिता पाणी घेण्यासाठी शेतकर्‍यांना पंपाच्या डिझेलसाठी मोठा भुर्दंड सहन करायला लागत होता. याचा शेतर्‍यांच्या नफ्यावरदेखील परिणाम होत होता. शेती फायदेशीर करण्यासाठी आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी सोलार पंप लावण्याची संकल्पना जिल्हाधिकारी जावळे यांना सुचली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत सीएसआरच्या माध्यमातून ४० दिवसांत ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.
 
मंगळवारी (१५ एप्रिल) जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरुपात या पोर्टेबल पंपचे हस्तांतरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सुमारे ४०० एकर क्षेत्रावर शेती करणार्‍या आदिवासी शेतकर्‍यांना पोर्टेबल सोलार पंपचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शेतकर्‍यांच्या, आदिवासी बांधवांच्या जीवनमानात आमुलाग्र बदल घडून येण्यास चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे, प्रांत ज्ञानेश्वर खुटवळ, तहसीलदार किशोर देशमुख, कृषी अधिकारी महादेव करे, मकरंद बारटक्के, शेतकरीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

alibag
 
जमिनीचे मालक वेगळे आणि शेतकरी वेगळे असल्यामुळे पारंपरिक ‘सोलार पंप’ बसवणे शक्य नव्हते. यावर उपाय म्हणून ‘पोर्टेबल आणि मुव्हेबल सोलार पंप सेट’ तयार करण्याची संकल्पना मांडण्यात आली. सोलार क्षेत्रात काम करणारे अभिजित धर्माधिकारी यांच्या मदतीने हा अभिनव सोलार सेट डिझाईन करण्यात आला, जो ट्रॅक्टरच्या सहाय्याने एका शेतातून दुसर्‍या शेतात नेला जाऊ शकतो.
 
सध्या या पोर्टेबल सोलार पंप सेटची यशस्वी चाचणी पार पडली असून, त्यामधून पाच एचपी क्षमतेने पाणी पंपिंग करण्यात येत आहे. लवकरच असे आणखी सोलार पंप उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे आदिवासी शेतकर्‍यांचे डिझेलवरील अवलंबित्व कमी होऊन सुमारे १.३० कोटी रुपयांची वार्षिक बचत होणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0