पाच वर्षांच्या दोन चिमुरडींवर , शाळेच्या बसमध्ये क्लिनरचा अत्याचार

18 Apr 2025 12:36:33
KARJT
 
कर्जत | अतिशय धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात समोर आली आहे. कर्जत येथील एका शाळेत जाणार्‍या दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बसमध्ये क्लिनरने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी क्लिनरला अटक केली आहे. या घटनेनंतर पालकांच्या पायाखालची जमीन सरकली असून संतापाची लाट उसळली आहे.
 
कर्जत येथील एका शाळेत या मुली शिकत आहेत. पाच वर्षे वय असलेल्या मुली इतरांप्रमाणेच शाळेच्या बसने शाळेत जात असत. मुले बसमध्ये बसल्यानंतर बसचा क्लिनर करण दिपक पाटील (वय २४, रा. वदप) हा नराधम त्या मुलींना चालकाच्या मागच्या सीटवर येऊन बसायला सांगायचा आणि त्यांना मांडीवर बसवून त्यांच्याशी अश्लिल चाळे करायचा.
 
सांगूनही त्या मुली सीटवर बसायला गेल्या नाही, तर तो त्यांना मारहाण करायचा.हा सर्व प्रकार गेले वर्षभरापासून पीडित मुलींसोबत होत असल्याचे त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे. याबाबतची माहिती पीडितमुलीनी त्यांच्या घरी दिल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाला वाचविण्यासाठी पीडितांच्या पालकांवर दबाव टाकल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. त्यामुळे संताप अधिक वाढला आहे.

KARJT
 
पोक्सो अंतर्गत गुन्हा दखल...
कर्जत चौक रस्त्यावरुन राजमुद्रा चौक ते स्कूल यादरम्यान गाडीचा क्लिनर असलेला करण पाटील हा एप्रिल २०२४ पासून १६ एप्रिल २०२५ पर्यंत विद्यार्थिनींशी अश्लिल चाळे करीत होता. पालकांच्या तक्रारीनंतर त्याच्यावर कर्जत पोलीस ठाणे येथे बालकांचे लैंगिक अपराध यांच्यापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १०, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जंगलात लपला होता
प्रकरण समोर आल्यानंतर करण पाटील याच्या घराच्या लोकांनी त्याला चोप दिला होता. त्यानंतर हा तरुण जंगलात पळून गेला होता आणि तेथे लपून बसला होता. रात्री साडेदहा वाजता पालक, कर्जत पोलीस ठाणे येथे पोहचल्यावर कर्जत पोलीस वदप येथे पोहचले आणि स्थानिकांच्या मदतीने त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
२२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
करण पाटीलला गुरुवारी (१७ एप्रिल) दुपारी कर्जत न्यायालयात आणले असता पालकांनी गाडीतून उतरणार्‍या तरुणावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र अशी परिस्थिती उद्भवू शकते याची कल्पना पोलिसांना असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त कर्जत न्यायालय आवारात लावला होता.
 
न्यायालयाने पाच वर्षीय मुलींचा लैंगिक छळ करणार्‍या त्या तरुणाला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रकार ज्या बसमध्ये घडला ती स्कूलबसदेखील ताब्यात घेतली असल्याची माहिती जिल्हा पोलीस उपअधीक्षक डी.डी. टेले आणि कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी दिली.
 
दरम्यान, यापूर्वी बदलापूरमध्ये असाच प्रकार नुकताच घडला होता, आणि आता कर्जतमध्येही ही विकृती समोर आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र"अशा नराधमांना कठोर शिक्षा द्या!", अशी मागणी आता पालक वर्गातून जोर धरू लागली आहे.
 
KARJT
मनसेची आक्रमक भूमिका ...
या घटनेनंतर मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रसन्न बनसोडे यांनी कर्जत पोलिसांची भेट घेतली. यावेळी त्यांनी करण पाटील याच्यावर कडक कारवाई करताना, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी केली आहे. तसेच सदर बसचालक, बसमालक व शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करावा. जेणेकरुन भविष्यात अशा प्रकाच्या लोकांना चाप बसेल, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0