स्विमिंग पूलमध्ये बुडून चिमुरडीचा मृत्यू , मुरुड शहरातील धक्कादायक घटना

21 Apr 2025 20:10:07
 Murud
 
मुरुड जंजिरा | पुण्याहून मुरुडमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांच्या लहान मुलीचा हॉटेलमधील स्विमींग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. माही चक्रधर ताकभाते (वय ५ वर्षे) असे या चिमुरडीचे नाव आहे. सध्या मुरुड येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे मुरुड समुद्र किनारा व आजुबाजूचा परिसर गजबजून गेला आहे.
 
असेच चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय अंतर्गत असणार्‍या सांगवी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणारे चक्रधर कृष्णा ताकभाते व त्यांचे तुळजापूर येथे गट विकास अधिकारी असलेले चुलत भाऊ अमोल ताकभाते या दोघांचे कुटुंबीय हे १८ एप्रिल रोजी मुरुड जंजिरा येथे सागरी पर्यटनासाठी आले होते. त्यांनी मुरुडमध्ये आल्यानंतर हॉटेल शी सेलमध्ये मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.
 
दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी हॉटेलच्या अभ्यागत कक्ष येथून तिसर्‍या मजल्यावर असलेल्या रूमच्या किल्ल्या घेऊन ते वर रुमवर गेले. एका रुममध्ये चक्रधर ताकभाते आणि अमोल ताकभाते हे गेले होते. तर दुसर्‍या रुममध्ये या दोघांच्या पत्नी बोलत बसल्या होत्या.याचदरम्यान चक्रधर ताकभाते यांची मुलगी माही (वय ५) आणि अमोल ताकभाते यांची मुलगी अन्वी (वय ५) या दोघी कोणालाही काही न विचारता दुपारी दोनच्या सुमारास तिसर्‍या मजल्यावरून खाली खेळण्यासाठी गेल्या.
 
माहीने स्विमींग पूल पाहून बाजुला चप्पल काढली आणि ती पूलमध्ये उतरली. ती बुडत असल्याचे पाहून अन्वीही हॉटेलच्या तिसर्‍या मजल्यावर परत गेली अन् घटनेची माहिती दिली. हे ऐकून चक्रधर ताकभाते आणि अमोल ताकभाते यांनी खाली धाव घेतली. माहीला पाण्याबाहेर काढुन तातडीने ग्रामीण रुग्णालय मुरूड येथे दाखल करण्यात आले. मात्र खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. माहीचा मृतदेह शवविच्छेदन करून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वडील चक्रधर ताकभाते यांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान, या घटनेची नोंद मुरुड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0