सुधागडात विजेचा लपंडाव महावितरणाचा गलथान कारभारामुळे नागरिक त्रस्त

26 Apr 2025 18:10:45
 pali
 
सुधागड-पाली | सुधागड तालुक्यात मागील काही दिवसांपासून विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे नागरिकांचे जीवन त्रस्त झाले आहे. दिवसातून आठ ते दहा वेळा आणि रात्री सात ते आठ वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, बँका, झेरॉक्स सेंटर तसेच घरगुती ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
 
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. वीज पुरवठ्यातील या अनियमिततेमुळे अनेक ठिकाणी कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. नागरिकांकडून वेळेवर वीज बिल भरण्यासाठी दबाव टाकणारे अधिकारी, वीज पुरवठ्याच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. संपूर्ण तालुक्यात सध्या अघोषित भारनियमन मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
 
नागरिकांनी विचारणा केली आहे की, "कुठेही भारनियमन नसताना सुधागड तालुक्यात वारंवार वीज पुरवठा का खंडित होतो?” यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे, तसेच संभाव्य असंतोष उफाळण्याची शक्यता आहे. समस्यांकडे वेळीच लक्ष न दिल्यास नागरिकांचा संताप अधिक वाढू शकतो. सामान्य नागरिक महावितरणच्या गलथान कारभाराला वैतागले असून, व्यवस्थापनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
 
सुधागड तालुक्यात वारंवार होणार्‍या वीज खंडितीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणने वेळेत या समस्यांकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी, अन्यथा जनआंदोलन उभे करावे लागेल. - विदेश आचार्य, पाली शहरप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
आम्ही वेळेवर वीज बिल भरतो, मात्र त्याबदल्यात आम्हाला योग्य दर्जाचा वीज पुरवठा मिळत नाही. दिवस-रात्र होणार्‍या वीज खंडितीमुळे कामांमध्ये अडथळे येत आहेत. आता महावितरणने या समस्यांवर लक्ष देण्याची वेळ आली आहे. - सचिन ढोबळे, व्यावसायिक
 
 
Powered By Sangraha 9.0