म्हसळा | शहरांत अरुंद रस्त्यांमुळे स्वयंशिस्तीचे धोरण आणि पोलीस प्रशासनाला मदत म्हणून एस.टी. मंडळाच्या बसेस वन वे मार्गा ने जात असतात, परंतु अन्य खाजगी वाहने दोनही बाजूने वाहतुकीचे नियम तोडून जातात. अशातच तांबट आळीतील अरुंद रस्त्यावर श्रीवर्धन कोलमांडला मुंबई बस मुंबईच्या दिशेने जात असताना श्रीवर्धनकडे जाणार्या वॅगनारचा चालक अब्दुल हाजी नजीर अहमद खतीब (वय ४०, रा. आगरदांडा) याची कार एसटीला घासली.
त्यामुळे संतापलेल्या कारचालकाने कारमधून उतरून एस.टी. चालकाच्या केबिनमध्ये घुसून चालक लिंबराज चोरमले (वय ३५) यांना बेदम मारहाण केली. एसटी वाहक गणेश पवार यांनी कारचालक अब्दुल हाजी खतीब याला ‘आमची चूक काही नाही’ असे सांगितले. त्यानंतरही संतापाच्या भरात कारचालकाने गणेशलाही मारहाण केली.
याप्रकरणी एसटी वाहक, चालकाने म्हसळा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी कारचालक अब्दुल हाजी खतीब याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १३२, १२५ (२), ३५२ अन्वये म्हसळा पोलिसानी गुन्हा नोंदविला आहे. कारचालक खतीब याने केलेल्या मारहाणीमुळे बसमधील प्रवासी आणि म्हसळा शहरातील नागरिकानी नाराजी व्यक्त केली.