नवीन पनवेल | किराणा दुकानाचे फोटो आणि शूटिंग करताना याबाबत विचारणा केली असता तुमच्या विरोधात छेडछाडीची तक्रार करते असे बोलून ५० हजारांची मागणी केल्याप्रकरणी तिघांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गिरीश वळसे यांचा पनवेल महानगरपालिका मैदानाजवळ किराणा स्टोअर्स आहे ते आणि काका दुकानात असताना इनोव्हा कार क्रमांक एमएच ०२ सीव्ही ७८४० मधून रिता यादव, ममता यादव, रवी पवार हे उतरले. आणि दुकानात येऊन दुकानाचे फोटो आणि शूटिंग करू लागले. काकांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी थांबा, तुम्हाला कोण आहे दाखवते असे बोलून त्यांच्या अंगावर येऊन शिवीगाळ केली.
यावेळी ममता यादव ही दुकानाच्या ड्रॉवरमधून पैसे काढण्यास गेली असता वळसे त्यांना अडवण्यासाठी गेला. तेव्हा तुम्ही गुटखा विकता तुमचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून तुमच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करतो असे बोलली. त्यानंतर रवी पवार याने आम्ही पत्रकार असून आमची ताकद दाखवतो असे बोलून शिवीगाळ करून मारहाण केली.
काका धीरज यांनी त्यांना तुमचे ओळखपत्र दाखवा आणि पोलीस ठाण्यात चला असे बोलले असता ममता यादव यांनी आरडाओरडा करून तुमच्या विरोधात छेडछाडीची तक्रार दाखल करते असे बोलली आणि हे प्रकरण मिटवायचे असल्यास पन्नास हजारांची मागणी केली. या प्रकरणी तिघां विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.