खा.सुनील तटकरेंनी स्थानिक जनतेवर अन्याय करु नये...सीएसआरवरुन आ.महेंद्र दळवी यांनी सुनावले

By Raigad Times    28-Apr-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | अलिबाग आणि आसपासच्या कंपन्यांचा सीएसआर फंड (विकास निधी) स्थानिक गरजू गावांना डावलून खा. सुनील तटकरे हे अन्य ठिकाणी नेत असल्याने अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या जनतेने निवडून दिले आहे, त्यांचा विकास निधी केवळ तुमच्या रोयीसाठी फक्त एक दोन तालुक्यांत नेणे कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी विचारला आहे. रायगड जिल्ह्यात अनेक कंपन्या आहेत.
 
या कंपन्या त्यांच्या नफ्यातील दोन टक्के रक्कम सीएसआरच्या (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) माध्यमातून स्थानिक भागात वापरत असतात. या निधीचा वापर हा, गरिबी आणि भूक निर्मूलन, आरोग्य सेवा आणि स्वच्छताश् शिक्षण, कला आणि संस्कृतीचे जतन करणे तसेच ग्रामीण विकासासाठी करत असतात. कंपनी कायद्यात सीएसआर खर्च करण्यासाठी कोणतीही विशिष्ट किलोमीटरची मर्यादा नाही.
 
मात्र कंपन्यांनी त्यांच्या परिसरातील आणि त्यांच्या कार्यामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांच्या विकासासाठी योगदान द्यावे, हा यामागे मूळ हेतू आहे. त्यामुळे कंपन्यांनी त्यांच्या स्थानिक क्षेत्राला विशेषतः ज्या भागात त्या कार्यरत आहेत, अशा आसपासच्या भागांना प्राधान्य द्यावे असे या कायद्याला अपेक्षित आहे. मात्र कंपनी कुठल्याही तालुक्यात असो, रायगडचे खासदार सुनील तटकरे हे त्यांचा निधी केवळ एक दोन तालुक्यांत नेऊन वापरत आहेत.
 
अलिबागलगत आरसीएफ, गेल, रिलायन्स आणि जेएसडब्ल्यूसारख्या कंपन्या कार्यरत आहेत. यांचा सीएसआर फंडथानिक परिसरात वापरणे अपेक्षित आहे; मात्र तसे न करता खा. सुनील तटकरे हे हा फंड त्यांच्या सोयीच्या ठिकाणी नेत आहेत; परिणामी कंपनी परिसरातील गावांवर, तेथील नागरिकांवर अन्याय होत असल्याचे आ.महेंद्र दळवी यांनी म्हटले आहे.
 
खासदारांनी या कंपन्यांचा निधी त्या त्या तालुक्यात स्थानिक पातळीवर वापरायला हवा. अलिबाग, पेणसारख्या तालुक्यांनी तटकरेंना निवडून देताना भरभरुन मतदान केले होते. त्यामुळे खासदार झाल्यानंतर तटकरे यांनी या तालुक्यांवर अन्याय करु नये, असे आवाहन आ. दळवी यांनी केले आहे.