पालकमंत्रीपदासाठी मंत्री भरत गोगावले यांचे वाघेश्वराला साकडे , इच्छा माझी पुरी करा - भाग २

By Raigad Times    29-Apr-2025
Total Views |
 mumbai
 
मुंबई | देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची स्थापना होऊन आता मंत्रिमंडळ बर्‍यापैकी स्थिरावले आहे. पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्याची सूत्रे हाती घेतली आहेत. मात्र रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. यावर मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा इच्छा बोलून दाखवली असून, वाघेश्वराकडे आपण साकडे घातल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले आहेत; पण रायगड जिल्हा हा पालकमंत्र्यांविनाच आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते भरत गोगावले हे आणि आमदार रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी अडून बसलेले आहेत. तर दुसरीकडे मंत्री अदिती तटकरे यांच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडावी यासाठी त्यांचे वडील सुनील तटकरे आपली पूर्ण ताकद लावत आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा तिढा जास्तच वाढला आहे.
 
रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तटकरे कुटुंब आणि शिवसेना पक्षाचे मातब्बर नेते भरत गोगावले हे या पदासाठी अडून बसलेले आहेत. त्यातच आता भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदावर पुन्हा एकदा महत्त्वाचे भाष्य केले आहे. ते पुण्याच्या दौर्‍यावर असताना त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले.
 
पालकमंत्रीपदावरही ते बोलले. "माझी पालकमंत्रीपदाची इच्छा लवकरच पूर्ण होईल. वाघेश्वराकडे आल्यानंतर बर्‍याचशा इच्छा पूर्ण होतात. माझी पालकमंत्रीपदाची इच्छा पण पूर्ण होईल,” असे ते यावेळी म्हणाले. दरम्यान, गोगावले यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत वेगवेगळ्या चर्चांना सुरु झाली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याबाबत नेमका काय निर्णय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.