रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्प, विकासकामांना गती देण्यासाठी बैठक

09 Apr 2025 17:40:44
mumbai
 
मुंबई | रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्प, विकासकामांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांची विशेष उपस्थिती होती.
 
या बैठकीत रोहा तालुक्यातील जामगाव येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता, वने व उद्यान प्रकल्पात राखीव वने तसेच निसर्ग पर्यटनस्थळांच्या विकासाचा ८० कोटींचा सुधारित प्रस्ताव तात्काळ सादर करावा. उपलब्ध ३० कोटींच्या निधीतून सध्या सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
 
रोहा तालुक्यातील जामगाव येथील डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता, वने व उद्यान प्रकल्पातील विकासकामे, रोहा तालुक्यातील मौजे तिसे येथील केदारजननी माता देवस्थानाच्या ठिकाणी रोपवेची उभारणी करणे, रोहा तालुक्यातील मौजे संभे या दरडप्रवण गावाचे सुरक्षिततेच्या कारणास्तव पुनर्वसन करणे, तळा तालुक्यात गिरणे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठांतर्गत खारभूमी संशोधन केंद्राची उभारणी करण्यात यावी.
 
तसेच श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे केंद्र शासन पुरस्कृत स्वदेश दर्शन योजनेतून मत्स्यालय, पर्यटक निवारा केंद्राची निर्मिती, मुरुड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्याचा समावेश गडकोट किल्लेसंवर्धन योजनेत करण्यासह मुरुड किल्ला परिसर आणि राजापूरी ग्रामपंचायत क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासंदर्भात या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
 
बैठकीला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, खासदार सुनील तटकरे,नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, कोकणचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आदींसह शासनाच्या संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
रोहा तालुक्यातील मौजे तिसे येथील केदारजननी माता देवस्थानाच्या ठिकाणी रोपवे उभारणीसंदर्भातहीबैठकीत चर्चा झाली. केंद्र शासनाच्या पर्वतमाला योजनेंतर्गत राज्यात कळसूबाई, हरिश्चंद्रगड, माथेरान, सिंहगड, शिवनेरी, राजगड, भीमाशंकर, लेण्याद्री, जेजुरी, निमगाव खंडोबा आदी ४५ ठिकाणी रोपवे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. या यादीत तिसे येथील केदारजननी माता देवस्थानचा समावेश करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा. तो शासनाच्या मंजूरीसह केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल.
 
हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी वनविभागाकडून आवश्यक परवानगी मिळविण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मुरुड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्याचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन या किल्ल्याचा समावेश गडकोट किल्लेसंवर्धन योजनेत करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
 
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे केंद्र शासन पुरस्कृत स्वदेश दर्शन योजनेतून मत्स्यालय, पर्यटक निवारा केंद्र उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्दे श उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांचे अधिकारी तसेच रायगडचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0